Monday, September 6, 2010

aWARD FOR TEACHERS IN THE NAME OF THE FATHER

दि. २५ जानेवारी २००९ रोजी माझ्या वडिलांचे अचानक, आम्हाला त्यांच्या शुश्रुषेची कोणतीही संधी न देता निधन झाले. त्याअर्थी दि. २५ जानेवारी हा त्यांचा लौकिकार्थाने स्मृतीदिन ठरावा. पण मला त्यांचा खरा स्मृतीदिन ५ सप्टेंबर वाटतो. कारण हा शिक्षक दिन. यादिवशी त्यांना कोण भरते यायचे. मुळात उपक्रमशील असलेला त्यांचा स्वभाव उफाळून येई. काय करू आणि काय नाही असे त्यांना व्हायचे. सेवेत असताना त्यांच्यातला हाडाचा शिक्षक काहीतरी करून आपले हे भारावलेपण एखाद्या कार्यक्रमातून कृतकृत्य करीत असे. पण निवृत्तीनंतरही त्यांनी हे भारावलेपण जपलेच. शिक्षक व शिक्षण क्षेत्र यावर ते कळकळीने लिहीत. या क्षेत्रातील सर्व घडामोडींची त्यांना विलक्षण ओढ होती. शिक्षक कसा गुणी व अंतर्मुख असावा याबद्दल त्यांनी सातत्याने लिहिले. दै. विवेकसिंधुने त्यांना याबाबतीत सतत साथ दिली. सेवेत आणि नंतरही त्यांनी त्यांच्या परीने शिक्षण आणि शिक्षक यांसाठी जे काही केले ते आम्हाला आदर्श वाटते. कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न बाळगता, त्यांनी हे केले. पुरस्कार त्यांच्याकडे फिरकले नाहीत. तेही त्यांच्याकडे फिरकले नाहीत. मात्र म्हणून आदर्शांची गळचेपी होवू नये. यासाठी आम्हाला त्यांचा, त्यांच्या विचारांचा, तळमळीचा सन्मान व्हावा असे वाटे. त्यातून त्यांना स्वतःला तर हुरूप येईलच पण आदर्शांची चळवळ होईल, व्हावी असे आम्हाला वाटत असे. त्यांना आदर्श आणि परिपूर्ण शिक्षक मानणारे अनेक विद्यार्थी, सहकारी आणि मित्र होते. पण ते सर्व खाजगी स्वरुपात. लोकमान्य अशा पद्धतीने त्यांचा सन्मान अपवादानेच झाला असेल. मात्र त्यावरही ते प्रतिक्रिया देवून समाधान व्यक्त करीत नसत. सन्मान करणाऱ्यांचा आभारपूर्वक उल्लेख अवश्य करत. पण शिक्षक आणि शिक्षणक्षेत्र यांतील दुरवस्था आणि अनास्था त्यांना अस्वस्थ करी. त्यामुळे त्यांना अशा अर्थाने केलेल्या कामाचे समाधान मिळत नसे. सतत अजून खूप काहीतरी केले पाहिजे आणि या क्षेत्राचे अध:पतन व हनन थांबून उदात्तीकरण झाले पाहिजे असे वाटे.


त्यांच्यासारखे तेच एक होते असे नाही. त्यांच्यासारखे अगणित शिक्षक असा विचार आणि काम करीत आहेत. याची जाणीव ठेवून आज शिक्षक दिन व त्यांच्या या स्मृतींच्या निमित्ताने एक संकल्प आम्ही सोडत आहोत.

स्व. बाबांना कधी पुरस्कार मिळाला नाही. पण म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्य व काम करण्याची बांधिलकी सोडली नाही. अशा, विशेषत: तरूण शिक्षकांसाठी मराठवाडा पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचे जाहीर करत आहोत.

पुरस्कार देणारीही अनेक गुणग्राहक मंडळी आहेत. पण आमची ग्वाही आहे की कै. सुधाकरराव कुलकर्णी या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार हा आगळावेगळा खऱ्याखुऱ्या शिक्षकाला न्याय देणारा असेल.

यासाठी अर्थातच सर्वांची साथ आवश्यक आहेच. ती मिळेल अशी खात्री आहे.

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.